नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव | प्रतिनिधी
जळगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड घडली असून भाजपचे ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले जाणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जवळचे मानले जाणारे अनेक कार्यकर्ते आता शिवसेनेच्या शिंदे गटात दाखल झाले आहेत. मुंबईतील नंदनवन या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पक्षप्रवेशामुळे जळगाव शहरातील भाजपला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे मंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले भूषण भोळे आणि भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनीही शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे स्वागत करत संघटन अधिक मजबूत करण्याचा विश्वास व्यक्त केला. तर दुसरीकडे जळगाव शहरात या घडामोडीमुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असून शिंदे गटाला नवसंजीवनी मिळाल्याचे बोलले जात आहे.
या पक्षप्रवेशात भूषण भोळे, राहुल पाटील, प्रशांत कोळी, विशाल महाजन, महेश पाटील, मुकेश पाटील, गणेश बच्छाव, प्रशांत चौधरी, राजीक पटेल, ओम बारी, रंजन पाटील, चेतन चौधरी, अक्षय भडांगे, सुयोग गुजर, विकास ठाकरे, जयेश पाटील, सागर पाटील, लोकेश पाटील, भावेश पाटील, दीपक कोळी, तौफिक खान यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.
या घडामोडीनंतर जळगावमधील आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून भाजप आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.





