नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : एन. आय. एफ. ग्लोबल – संगीता अकॅडेमी, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “अचिव्हर्स अवॉर्ड 2026” हा पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. फॅशन व इंटिरियर डिझाईन क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, महापौर दीपमाला काळे तसेच संचालिका संगीता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सुरेश भोळे यांनी फॅशन व डिझाईन क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होत असून विद्यार्थ्यांनी आधुनिक कौशल्य आत्मसात करून जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करावी, असे आवाहन केले. तसेच एन. आय. एफ. ग्लोबल – संगीता अकॅडेमीने गेल्या 21 वर्षांत हजारो विद्यार्थ्यांना घडवून जळगावचे नाव देश-विदेशात पोहोचविल्याचे कौतुक त्यांनी केले.
मंत्री संजय सावकारे यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन नवउद्योजकांनी उद्योग उभारावेत व रोजगारनिर्मितीत योगदान द्यावे, असे सांगितले. महापौर दीपमाला काळे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शुभेच्छा देत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत असल्याचे नमूद केले.
प्रास्ताविकात संचालिका संगीता पाटील यांनी अकॅडेमीच्या 21 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेत विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानासह व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती दिली.
यावेळी इंटिरियर डिझाईन क्षेत्रातील मुकेश तोष्णीवाल, योगिता शर्मा, रितेश तुलसाणी, चार्मी नथाणी, विराज पटेल, पार्थ पटेल, अक्षता बखतवाणी, फिल्झा शेख, मयूर जाधव, प्रसाद अकोले, जयेश जैन, पूजा बोरसे, अंजली जोशी, रुपेश पाटील, प्रफुल चौधरी, रितू मकडीया, कोमल ओझा, खुशी डहाळे, मयूर हिंगे, आचल बयास, झैन पटेल, शुभांगी वानखेडे आदी विद्यार्थ्यांना तसेच फॅशन डिझाईन क्षेत्रातील स्नेहा मोरे, मयुरी बोहरे, शेजल गोपालदास, मानसी मलिचकर, रुणाली पाटील, तानिया कुकरेजा, भुवनेश्वरी करंकाल, दिव्यानी देशमुख, कोयल कोळी, स्नेहल ब्राह्मणकर, केसर जोशी, नेहा देसले, भाग्यश्री ठाकूर व अनम अन्सारी यांना “अचिव्हर्स अवॉर्ड 2026” प्रदान करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मानसी जैन व तेजस्विनी कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.







