नवराज्य Live न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाइन जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर आता विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, प्रमाणपत्र व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाने प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सोमवार, दि. २६ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गुणपत्रिका व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.
त्यानंतर त्याच दिवशी दुपारी ३ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत गुणपत्रिका, प्रमाणपत्र, स्थलांतर प्रमाणपत्र तसेच तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख वितरित करण्यात येणार आहेत.
या संदर्भात सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना विभागीय मंडळांकडून सूचना देण्यात आल्याचे राज्य मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी पत्रकात नमूद केले आहे. तसेच संबंधित विद्यार्थी, पालक व प्राचार्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.






