✍ नवराज्यLive न्यूज नेटवर्क
जळगाव (प्रतिनिधी):
शिरसोली गावात महापुरुषांचे छायाचित्र असलेले बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडल्याची घटना घडल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर वेगाने पसरल्याने नागरिक मोठ्या संख्येने बसस्थानक परिसरात जमा झाले.
घटनेची माहिती मिळताच एका स्थानिक नागरिकाने त्या ठिकाणाची चित्रफित मोबाईलमध्ये टिपून सोशल मीडियावर प्रसारित केली. काही वेळातच ती व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत निषेध नोंदवला आणि घोषणाबाजी केली. काहींनी ठिय्या आंदोलनही केले.
परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला समजावून सांगत शांतता राखण्याचे आवाहन केले.
दरम्यान, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांनीही घटनास्थळी येऊन नागरिकांशी संवाद साधला व संयम बाळगण्याचे आवाहन केले. संतप्त नागरिकांनी दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.
काही काळ वातावरण तणावपूर्ण असले तरी पोलिसांनी योग्य समन्वय साधत परिस्थिती नियंत्रणात आणली. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर जमाव हळूहळू पांगला.
यानंतर नागरिकांनी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात धाव घेत अधिकृत तक्रार नोंदवली. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.
तसेच, ही घटना व्हायरल करणाऱ्या व्यक्तीचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. अफवा आणि अपप्रचारामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी अशा प्रकारांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
घटनेनंतर परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन करण्यात आले आहे.







