
नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव, दि. १९ (प्रतिनिधी) – शहरातील स्टेट बँक चौकाचे ‘प.पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार चौक’ असे नामकरण करण्यात येऊन चौकाच्या सुशोभीकरण व नूतनीकरण कामांचे भूमिपूजन गुरुवारी उत्साहात पार पडले.
जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या अंतर्गत चौकाचे सुशोभीकरण, रस्त्यांची दुरुस्ती, प्रकाशयोजना आणि सौंदर्यवृद्धी केली जाणार आहे.
या कार्यक्रमाचे भूमिपूजन उद्योजक रजनीकांत शेट कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांची विशेष उपस्थिती होती. तसेच आमदार सुरेश भोळे, महापौर सौ. दिपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी तसेच भाजप जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी उपस्थित होते.
मान्यवरांनी यावेळी बोलताना सांगितले की, डॉ. हेडगेवार यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन शहराच्या विकासासाठी अशा उपक्रमांना गती देण्यात येणार आहे. चौकाच्या सुशोभीकरणामुळे परिसराचे सौंदर्य वाढून नागरिकांना अधिक सुविधा मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन भाजप महानगरतर्फे करण्यात आले होते.







