नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव – मोहाडी जळगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र नागाई-जोगाई मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त सालाबादप्रमाणे यंदाही भव्य महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर, कांताई बंधाऱ्याजवळ असलेल्या या तीर्थक्षेत्रात रविवारी दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता महापूजा संपन्न होणार आहे.
महापूजेचा मान जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे प्रमुख . अशोक भाऊ भंवरलालजी जैन व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. ज्योती भाभी अशोकभाऊ जैन यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.नागाई-जोगाई तीर्थक्षेत्र हे जिल्ह्यातील श्रद्धास्थान मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे विशेष पूजा-अर्चा, अभिषेक व दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. यंदाही भाविकांनी सहपरिवार व इष्ट मित्रांसह उपस्थित राहून महापूजेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. प्रभाकर आप्पा गोटू सोनवणे यांनी केले आहे.
या कार्यक्रमास स्थानिक ग्रामस्थ तसेच जळगाव तालुक्यातील नागझिरी, मोहाडी, धानोरा, दापोरा, खेडी, कढोली व शिरसोली परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थ व मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.भाविकांच्या सोयीसाठी जळगाव शहरातील जुना बसस्टॅण्ड येथून धानोरा मार्गे जाणाऱ्या सिटी बसने नागाई-जोगाई मंदिर स्टॉप पर्यंत येण्याची सुविधा उपलब्ध आहे.महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर नागाई-जोगाई च्या चरणी भाविकांनी उपस्थित राहून दर्शन व महापूजेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.







