प्रभाग ५ मध्ये महायुतीच्या भव्य रॅलीने शहराचे लक्ष वेधले
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव । जळगाव महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्र. ५ मधील महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आज काढण्यात आलेल्या ‘महारॅली’ने शहराचे लक्ष वेधून घेतले. राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन व पॅनल प्रमुख नितीन लढ्ढा यांच्या हस्ते हनुमान मंदिरात नारळ वाढवून या प्रचार दौऱ्याचा भव्य शुभारंभ करण्यात आला. या रॅलीच्या माध्यमातून महायुतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करत विजयाचा निर्धार व्यक्त केला. या रॅलीमध्ये जळगावच्या खासदार स्मिता वाघ, शहराचे आमदार सुरेश भोळे, चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि रिपाइं महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हनुमान मंदिर आणि गोलाणी मार्केट येथून सुरू झालेली ही रॅली गायत्री मंदिर परिसर, गुरुद्वारा, नटराज टॉकीज, पांडे डेअरी चौक, गणेश वाडी अशा विविध भागांतून मार्गस्थ झाली. रॅलीमध्ये ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि महिला व युवकांची लक्षणीय उपस्थिती लाभल्याने यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण होते. जागोजागी उमेदवारांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. प्रचार दौऱ्यादरम्यान महायुतीच्या नेत्यांसह उमेदवारांनी दिलीय या मुद्द्यांवर भर? – शहराचा सर्वांगीण विकास: जळगाव शहराला खड्डेमुक्त करणे आणि अमृत योजनेची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन. – डबल इंजिन सरकारचे फायदे: केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारमुळे जळगावच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. – पाणीपुरवठा आणि स्वच्छता: प्रभागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि नियमित स्वच्छतेवर विशेष लक्ष देणार. सुरक्षित जळगाव: हायटेक सीसीटीव्ही आणि चांगल्या पथदिव्यांद्वारे महिला व नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य. उमेदवारांचा निर्धार प्रभाग ५ मधील उमेदवार विष्णू रामदास भंगाळे, मंगला संजय चौधरी, आशा रमेश पाटील आणि नितीन बालमुकुंद लढ्ढा यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला. महायुतीच्या या विजयरथाला मतदारांनी प्रचंड प्रतिसाद देत ‘अब की बार, महायुती सरकार’चा नारा दिला. या रॅलीचा समारोप भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांच्या निवासस्थानी झाला.







