नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव – जळगाव रनर्स ग्रुपचे धावपटू गुरूप्रसाद तोतला यांनी राजस्थानमधील जैसलमेर बॉर्डर अल्ट्रा (हेल रन)येथे आयोजित अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत अभूतपूर्व यश मिळवले आहे. त्यांनी तब्बल १६० किमी अंतर अवघ्या २४ तास ३६ मिनिटांत पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली आहे. स्पर्धेदरम्यान तापमान २० अंशांपासून थेट शून्य अंशांपर्यंत घसरत होते. अशा प्रतिकूल वातावरणात इतके लांब अंतर पूर्ण करणे अत्यंत आव्हानात्मक असतानाही गुरूप्रसाद तोतला यांनी अपार जिद्द, मानसिक ताकद आणि चिकाटीच्या जोरावर हा पराक्रम साधला.
याच स्पर्धेत जळगावचेच धावपटू अजय सोमाणी यांनीही उत्कृष्ट कामगिरी करत १०० किमी अंतर १३ तास २१ मिनिटांत पूर्ण केले. दोन्ही धावपटूंच्या या यशामुळे जळगाव रनर्स ग्रुपची प्रतिष्ठा अधिक उज्वल झाली आहे. गुरूप्रसाद तोतला यांनी यापूर्वी खरदूंगला, लडाख, लवासा, सह्याद्री पर्वतरांगांसह देशभरातील अनेक फुल मॅरेथॉन व हाफ मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. सातत्य, शिस्त आणि न थांबणारी जिद्द या गुणांमुळे ते जळगाव रनर्स ग्रुपचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व मानले जातात.जळगाव रनर्स ग्रुपतर्फे गुरूप्रसाद तोतला आणि अजय सोमाणी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील धावण्याच्या उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही जळगाव रनर्स ग्रूपतर्फे सागर पार्क मैदान येथे खान्देश रन (मॅरेथॉन) चे आयोजन २८ डिसेंबर २०२५, रविवार रोजी करण्यात आले आहे. या मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असून जळगाव तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून या नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.तसेच खान्देश रनमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग व्हावा यासाठी जळगाव शहरातील नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन आपण, आपला परिवार आणि परिचितांनी खालील लिंकवर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन जळगाव रनर्स ग्रूपचे अध्यक्ष किरण बच्छाव यांनी केले आहे.







