नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी भारतीय किसान संघातर्फे करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी सोमवार, २८ सप्टेंबर रोजी जिल्हाभरातील विविध तालुक्यांत मोर्चे काढून तहसीलदारांना निवेदने देण्यात आली.
जळगाव येथे भारतीय किसान संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. जामनेर, धरणगाव, चोपडा, भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर, चाळीसगाव, जळगाव आदी तालुक्यांमध्येही तहसीलदारांना निवेदने देण्यात आली.
रावेर येथे भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव महाजन, जामनेर येथे जिल्हा मंत्री कर्ण बारी यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. धरणगाव येथे सेंद्रिय शेती आयाम प्रमुख डॉ. दीपक पाटील, जळगाव येथे रामदास माळी, तर चोपडा येथे तालुकाध्यक्ष अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
खरीप पिकांचे नुकसान; उत्पादन खर्च वाया
यंदा पावसाचे अत्यल्प आणि असमान वितरण झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जमीन मशागत, बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि सिंचनासाठी शेतकऱ्यांनी केलेला खर्च उत्पादन न आल्याने वाया गेला आहे. पिके करपून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे भांडवली तसेच उत्पादन खर्चाचे मोठे नुकसान झाले असून, त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी संघाने केली आहे.
हेक्टरी ५० हजार रुपये थेट खात्यात जमा करा
बुडालेल्या भांडवलासाठी आपत्कालीन निधीतून हेक्टरी ५० हजार रुपये थेट डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली. ही मदत नेहमीच्या नुकसानभरपाईच्या निकषांनुसार न देता विशेष पॅकेज म्हणून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
रब्बीसाठी बियाणे, खते मोफत द्या
खरीप हंगाम हातातून गेल्याने रब्बीची पेरणी करण्याची आर्थिक क्षमता अनेक शेतकऱ्यांमध्ये राहिलेली नाही. त्यामुळे रब्बी हंगामासाठी बियाणे, रासायनिक खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये गावपातळीवर विनामूल्य उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. पंचनाम्याच्या अटीवर मदत रोखू नये आणि पीक विम्याची भरपाई तातडीने पूर्ण करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कर्जवसुलीस स्थगिती आणि कर्ज पुनर्गठनाची मागणी
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पीक कर्जाच्या वसुलीस स्थगिती द्यावी, कर्जाचे पुनर्गठन करावे आणि नवीन रब्बी हंगामासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी किसान संघाने केली आहे. आपत्तीची परिस्थिती संपेपर्यंत कर्जावरील व्याजमाफी द्यावी, तसेच कर्जमाफी योजनेतील प्रोत्साहन अनुदानाचे २ लाख रुपये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली.
पाणी, चारा आणि रोजगारासाठी टप्प्याटप्प्याने उपाययोजना
परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा, फळबागांसाठी धरणातील पाण्याचे राखीव नियोजन, पशु छावण्या, रोजगार हमीची कामे तसेच नदी-नाले खोलीकरण यांसारख्या उपाययोजना टप्प्याटप्प्याने राबवाव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.




