नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : महापौर दीपमाला काळे यांनी आरोग्य विभागाला दर रविवारी शहरातील प्रमुख मार्केट परिसर साफसफाई करण्याची विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने रविवारी महापालिका प्रशासनाने शहरातील मुख्य गोलाणी मार्केट संकुलात व्यापक स्वच्छता मोहीम राबवली. व्यापाऱ्यांनी त्यांच्या दुकानाबाहेर कचराकुंडी ठेवून स्वतःचे मार्केट स्वच्छ राखण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
या मोहिमेदरम्यान महानगरपालिकेचे आयुक्त आदित्य जीवने यांनी स्वतः उपस्थित राहून संपूर्ण स्वच्छता मोहिमेची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान मार्केट परिसरातील दुकानांसमोरील वाढीव बांधकामे, पक्के ओठे, अनधिकृत फलक (बोर्ड) आणि इतर अतिक्रमणांमुळे नागरिकांना व स्वच्छतेला होणाऱ्या अडथळ्यांची आयुक्त जीवने यांनी गंभीर दखल घेतली. अशा अनधिकृत अतिक्रमणांवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे सक्त आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सदर स्वच्छता मोहीम आरोग्य विभागाच्या उपायुक्त निर्मला गायकवाड आणि आरोग्य विभाग प्रमुख समीर बोरोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी पार पाडली. यावेळी शहर अभियंता योगेश बोरोले उपस्थित होते.
महापौरांच्या आदेशाखाली प्रशासनाचे प्रमुख आयुक्त आदित्य जीवने यांच्या उपस्थितीत झालेल्या या साफसफाई मोहिमेमुळे व्यापारी व नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. नागरिकांसह व्यापाऱ्यांनी आता स्वतःचे मार्केट स्वच्छ राखण्याचे आवाहन महापौर दीपमाला काळे आयुक्त आदित्य जीवने यांनी संयुक्तरीत्या केले आहे. आपल्या दुकानाबाहेर कचराकुंडी ठेवावी तसेच कचरा होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.
त्याचबरोबर, गोलाणी मार्केट येथील शौचालयांची अवस्था अत्यंत विदारक आहे. त्यामुळे महापौर दीपमाला काळे यांनी आयुक्त जीवने यांना सूचना केल्या. नवीन मक्तेदाराला प्रसाधनगृह स्वच्छतेचे काम नेमून सर्व प्रसाधनगृह स्वच्छ करून ते सर्वांसाठी खुले करावे. जेणेकरून नागरिकांची गैरसोय दूर होईल. या सूचनामुळे गोलाणी मार्केटच्या स्वच्छतेच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे.







