नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने अल्पावधीत मोठी कामगिरी करत घरफोडी व वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळवले आहे. पोलिसांनी १० गुन्ह्यांचा छडा लावत पाच अट्टल आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांत जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुन्ह्यांचा तातडीने छडा लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करून गुप्त माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला.
.
तपासादरम्यान पोलिसांनी गुरुजीत सिंग सुजानसिंग बावरी, दीपक बापू पाटील, राजेश माणिक राठोड, सुमित संजय कोळी आणि महेश उर्फ संतोष भोई या पाच आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी १० गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यामध्ये ९ घरफोडी आणि १ मोटारसायकल चोरीचा समावेश आहे.
आरोपींकडून २ लाख ३० हजार रुपयांचा घरफोडीतील मुद्देमाल तसेच २ लाख रुपयांच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. अशाप्रकारे एकूण ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी गुरुजीत सिंग बावरी हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी, पेठ आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्यात मिळून १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्यावर एमपीडीए (MPDA) अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली होती.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकारी व गुन्हे शोध पथकाने संयुक्तपणे पार पाडली.





