नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव,- समाजाच्या तळागाळात निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या सेवाव्रतींचा गौरव करण्यासाठी केशवस्मृती प्रतिष्ठान व जळगाव जनता सह. बँक लि. यांच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा “डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार” यंदा कोल्हापूर येथील ज्येष्ठ समाजसेविका अनुराधा भोसले यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच संस्थास्तरीय पुरस्कार नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. या अग्रगण्य शेतकरी उत्पादक कंपनीस जाहीर झाला आहे.
या पुरस्कारांचे वितरण रविवार, दि. 1 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता जळगाव येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिर येथे होणार आहे. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री पोपटराव पवार व राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार असल्याची माहिती केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे प्रमुख डॉ. भरत अमळकर आणि जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने यांनी जळगाव जनता सहकारी बँक यांच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पुरस्कार निवड समितीत सौ. हेमलता अमळकर, अनिल भोकरे, पुंडलिक पाटील, विवेक पाटील, राहुल पवार आणि भानुदास येवलेकर यांचा समावेश आहे.
१ मार्च रोजी होणारा हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित नसून समाजातील निस्वार्थ सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि प्रेरणादायी कार्याचा उत्सव ठरणार आहे. सेवाव्रतींच्या कार्याचा गौरव करतानाच समाजातील युवकांना सकारात्मक दिशादर्शन देणारा हा कार्यक्रम ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केशवस्मृती सेवा संस्था समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.







